रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा
हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्याच्या हाताला राखी ( रेशमी धागा) बांधते तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला सुखसमाधान मिळो यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. ह्या राखी बांधण्यामागे एकच भावना असते की बहीण भावाचे एकमेकांवर असलेले प्रेम वाढत राहो.
रक्षाबंधन बरोबर श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण खास करून कोळी बांधव साजरा करतात.
पावसाळ्यात समुद्र खूप खवळलेला असतो तेव्हा कोळी लोक मासेमारी करत नाहीत.म्हणून समुद्राला शांत करण्यासाठी कोळी लोक श्रावण पौर्णिमेला एकत्र येऊन सागराची पूजा करून परत मासेमारीचा व्यवसाय सुरू करतात व भक्तीभावाने सागराला नारळ अर्पण करुन पूजा करून नैवेद्य दाखवतात.कोळी लोक आपल्या होड्या छान सजवून गाणी,नाच करून हा सण आनंदाने साजरे करतात.नारळीपौर्णिमेला नारळाच्या पदार्थाला विशेष महत्व असते .देवाला नारळीभात ,ओल्या नारळाची करंजी,तसेच नारळीपाक असा नैवेद्य दाखवतात.आज आपल्या शाळेत लताताईंनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेची माहिती सांगितली नंतर ताईंनी सर्वांना कुंकू लावून राखी बांधून ओवाळले आणि सर्वांना नारळी पौर्णिमेनिमित्त खाऊ म्हणून नारळाची बर्फी देण्यात आली.