मंगळागौर
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत साजरे करतात. हे व्रत पाच वर्षे केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान व इतर आन्हीक उरकून, दागदागिने घालून, नटून शंकराची व अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. वेगवेगळी सुवासिक फुले, १६ प्रकारची पत्री म्हणजे झाडांची पाने व कणकेपासून तयार केलेले दागिने वाहून देवीची पूजा केली जाते. पुरणपोळी, खीर व जेवणाचा नेवैद्य दाखवला जातो. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात.
आपल्या शाळेतही आपण ‘मंगळागौर’ साजरी केली. शाळेमध्ये सजावट केली होती. सगळी मुलं व ताई छान नटून व पारंपारीक पोशाख घालून आली होती. मंगळागौरीची पूजा करून आरती केली गेली. दंडफुगडी, झिम्मा, तांदूळसडू, पिंगा यासारखे अनेक खेळ ताईंनी व मुलांनी खेळले. या दिवशी मुलांना उपम्याचा खाऊ दिला गेला.