Ramabai jr school r

School Activities

OUR HISTORY/ इतिहास

 

श्री. जी. के. चितळे व त्यांच्या पत्नी श्रीमती शारदाबाई चितळे यांनी हौसेने बांधलेल्या घरांचे नाव विद्या मंदिर असे ठेवले. या बालमंदिरात १९३७ साली सुप्रसिध्द समाज कार्यकर्त्या श्रीमती शांताबाई कशाळकर या काही काळ हवापालट करण्यासाठी येऊन राहिल्या होत्या. त्यांनी विद्यामंदिर हे नांव सार्थ करावयासच जणू, घरमालकांच्या सम्मतीने लहान बालकांसाठी एक वर्ग सुरु केला. त्यांनी स्वतःला वेळ नसल्याने एका शिक्षेकेकरवी हा वर्ग त्या चालवीत होत्या. चार महिन्यानंतर श्रीमती कशाळकर पुन्हा दादरला राहावयास गेल्या. याच सुमारास श्रीमती शारदाबाई चितळे व मी, श्रीमती नाथीबाई ठाकरसी विश्वविद्यालयाची पदवी परीक्षा पास होऊन काहीतरी समाज कार्य करावे अशा विचारांत होतो. गावांत मराठी बालमंदिर नसल्याने आमच्या बालकांनी झालेली गैरसोय आम्हांस जाणवली होतीच. तेव्हा श्रीमती शांताबाई कशाळकरानी सुरु केलेला वर्ग आपणच ताब्यात घेऊन त्याचेच पुढे बालमंदिरात रुपांतर करावे असे आम्ही दोघींनी ठरविले. याप्रमाणे १९३८ साली एप्रिल महिन्यात विद्यामंदिराच्या दारात बालमंदिर अशी पार्टी प्रथमच झळकली. दादर विघागातील काही बालमंदिराचे अवलोकन करून आम्ही कामास सुरुवात केली. पुढे लवकरच श्री राधाबाई चित्तार या आमच्या कार्यात सामील झाल्या. आरंभी आमच्या बालमंदिरात फक्त आठच मुले होती. बाल्मान्दिराच्या कार्याची नीटशी माहिती नसल्याने पालकांचे बरेच गैरसमज असत. बालमंदिरात बाळाला घातले कि वर्षभरात लिहा वाचायला आलेच पाहिजे असा बऱ्याच पालकांचा विशेष;ता स्त्रीपालकांचा आग्रह असे. पांच वर्षाखालील मुलांना शिकवायचं ते काय व त्यासाठी आता पासून फीचा खर्च ( त्यावेळी १ रु फी होती. ) कशाला. अशी काहीची विचारसरणी त्यामुळे सुरवातीच्या या काळांत बाल्मान्दिराच्या कार्याच्या प्रचार करण्यात आम्हा चालकांना बराच वेळ खर्ची पडे, रस्त्यांतून येत जाता आमच्या नजरा बालमंदिरात पाठविण्याबद्दल त्यांच्या आयांची समजुत घालणे हे पुढील काम. बालमंदिराची माहिती पत्रके गावभर वाटली होती. आमच्या बालमंदिराचे काम दादरच्या शिशुविहारचा आदर्श पुढे ठेवुन करावे या हेतूने तेथील नुकत्याच सुरु झालेल्या बालअध्यापानाच्या वर्गात श्रीमती शारदाबाई चितळे व श्रीमती राधाबाई चित्तार यांनी आपली नावे नोंदविली.

 

अकरा व अडीच वाजेपर्यंत आमच्या बालमान्दिराचे काम करून त्या या वर्गात शिक्षण घेत. पुढे लवकरच खुद्द मैडम मान्टेसरी हिंदुस्थानात येवून अड्यार येथे त्यांनी तीन महिन्यांचा मान्टेसरी कोर्स सुरु केल्यावर श्रीमती शारदाबाई चितळे ह्या अड्यारचा कोर्स शिकून आल्या. श्रीमती राधाबाई चित्तार यांनी शिशुविहारचा अध्यापनाचा कोर्स पूर्ण केला. माझा मुलगा लहान असल्यामुळे मी मात्र घर व बालमंदिर या पलीकडे जाऊ शकले नाही, परंतु मान्टेसरी बाईची सर्व पुस्तके, व्याख्याने व सहकारी भगिनीची टिप्पणी यांचा मी घरीच कसून अभ्यास केला. याप्रमाणे बालमंदिर आदर्श चालविण्याची आम्ही जंगी तयारी केली. शक्यतो स्वहस्तेच बरीशची साधने तयार केली. आम्ही विना वेतन काम करून जमलेल्या फीच्या उत्पन्नातून छोटी टेबले, बसण्यासाठी आसने, फळे, तक्ते वगैरे सामान घेतले. तरी पण मान्टेसरी पद्धतीची साधने घ्यावयास पैसे कमी पडले. त्या वेळी श्रीमती शारदाबाई चितळे यांचे वडील पुण्याचे श्री ग. स. मराठे (अक्चुअरी मराठे ) यांनी आपल्या कन्येला तिच्या कार्यात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रु ५०० देणगी दाखल दिले. या रकमेतून सुरवातीला पुष्कळसे मान्टेसरी साहित्य खरेदी करणे आम्हांस शक्य झाले. यानंतर आम्ही बालशिक्षण तज्ञ श्रीमती ताराबाई मोडक यांचे पालकांसाठी व्याख्यान ठरविले. बालमंदिरात बालकांची संख्या हळूहळू वाढत होती पण ती वाढ आम्हाला समाधानकारक वाटत नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर हि सर्व परिस्थिती एकदम बदलली. पार्ले येथील लोकसंख्या भरमसाट वाढू लागली, अर्थात छोट्या प्रजेतही वाढ झाली . जागेच्या टंचाईमुळे छोट्याशा घरात मुलास संबध दिवसभर डांबून ठेवण्यापेक्षा बालमंदिराच्या मोकळ्या वातावरणांत बालकांस दोन-तीन तास आनंदाने बागडू द्यावे असे पालकांस वाटू लागले. स्त्रिया नोकरी करू लागल्यामुळे बालकांस बालमंदिरात पाठविणे त्यांना सोयीचे वाटू लागले. ध्यान्यरेशन, दुधकेंद्रावरील खेपा या अशा अनेक कारणांनी घरातील काम वाढून मातांस बालकांकडे लक्ष देण्यास वेळ हि नसे. दुपारी तीन तास बालक बालमंदिरात असले कि आयांना थोडी विश्रांती मिळून झाडलोट, निवडणे , टिपणे, दळण-कांडण वगैरे कामे स्वस्थपणे करता येवू लागली

यामुळे बालमंदिराची आवश्यकता जनतेस पटून बालमंदिराचे काम पालकांना पाहता यावे यासाठी एका रविवारी मुद्दाम बालमंदिर चालू ठेवले. सर्व शिक्षण साहित्य कौशल्यपूर्वक मोडून त्याचा वापर बालक कसा करतात हे पाहण्यासाठी सर्व मुलांचे पालक व पार्ले टिळक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका यांस आमंत्रण दिले होते. पुष्कळ पालक हा प्रयोग पाहून गेले. यामुळे आम्हांस हुरूप येवून आत्मविश्वास वाढला. पालकांनाही मान्टेसरी पद्धत व बाल शिक्षण याची काही कल्पना आली. वडील मंडळीनी शाळा व काम पाहिल्यामुळे बालकेही आनंदित झाली. हा अगदी अभिनव व अपूर्व प्रयोग विलेपार्ले येथील बालशिक्षण कार्यात मदत करण्यास उपयुक्त ठरला. मुलांची संख्या भराभरा वाढत होती. चितळे दापंत्याने आपली जागा बालमंदिरास मोफत दिली होती इतकेच नव्हे तर बालकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रसंगी स्वताची खोली व बाग याचाही वापर करण्यास परवानगी दिली होती. स्वत: गैरसोय सोसून आपल्या जागेत सतत १२ वर्षे बालमंदिराचे सर्वतोपरी संगोपन केले त्याबद्दल हे बालमंदिर त्यांचे सदैव ऋणी राहील. या सुमारास वेणूताई (हल्लीच्या मुख्याध्यापिका ) व श्री आशाबाई भिडे या दोन हौशी होतकरू भगिनी म्हणून दाखल झाल्या. मुलांची संख्या वाढल्याने बगे झाडांची सावली पाहून एक मंडप तयार केला होता व एक वर्ग तेथे घेण्यात येई, तरी पण जागेच्या अडचणीमुळे पुष्कळशा बालकांना बालमंदिरात प्रवेश नाकारावा लागे. बालमंदिर खासगी म्हणून ओळखले जात असल्याने काही फंड गोल करून मोठ्या जागेची सोय करणेही शक्य नव्हते.

यासाठी चालकांनी १९४५ साली जुलै मध्ये बालमंदिरास सार्वजनिक संस्थेचे रूप द्यावे असे ठरविले. त्यावेळेच्या समाजसेवेची हौस असलेल्या काही भगिनी आम्हांस सहकार देण्यास तयार झाल्या. बालमंदिर चालविणे ह्याबरोबर बालकांचा सर्वागीण विकास करण्याच्या उद्देशाने बाल वाचनालय, आरोग्य केंद्र, बाल क्रीडांगण वगैरे कार्ये यथावकाश होत गेली. नुत्य, संगीत, शिक्षण वगैरे चे वर्ग चालवायचे असे विशाल ध्येय ठेवून बाल विकास केंद्र या संस्थेची आम्ही स्थापना केली. या नंतरमुल बालविकास केंद्राच्या पहिल्या कार्यकारी मंडळावर आम्ही तिघी मुळ संस्थापिका - श्रीमती शारदाबाई चितळे, श्रीमती राधाबाई चित्तार, मी स्वत; आणि सात इतर देणगीदार सभासद म्हणून भगिनी अशा दहा जणी होतो. एका सध्या सुटसुटीत घटनेनुसार कामास आरंभ केला होता. १९४६ च्या डिसेंबर महिन्यात आम्ही आमची संस्था सोसायटीज रजिस्ट्रेशन Act अन्वये register करून घेतली. आता बाल विकास केंद्राने बालमंदिरास स्वतंत्र सोईस्कर व प्रशस्त इमारत असावी यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. विलेपार्ले येथील दानशूर नागरिक श्री. विष्णू बाळकृष्ण तथा तात्यासाहेब परांजपे यांच्याकडे आम्ही गेलो. आमच्या कार्याचे महत्व व जागेची अडचण लक्षांत घेऊन त्यांनी लगेच पार्ले टिळक विद्यालयासमोरची सुमारे ७५० चौरस वर क्षेत्रफळाची आपली जमीन आपल्या पत्नी की सौ. रमाबाई परांजपे याच्या स्मरणार्थ रीतसर कागदपत्र करून बालविकास केंद्रास देणगी दाखल दिली. त्याचे सुपुत्र श्री. बाबुराव व त्याचे इतर बंधू या सर्वांनी बहुमोल मदत केली. तसेच पार्ल्यातील इतर जनतेनेही यथाशक्ती साहाय्य केले.

त्यामुळे १९५० साली केंद्राला स्वत;ची अशी छोटीशी इमारत उभी करणे शक्य झाले. 'घर पाहावे बांधून ' असा एक वाक्प्रचार आहे. त्यातील मर्म बालमंदिराच्या ह्या पहिल्या बांधकामाचे वेळी आमच्या प्रत्ययास आले. निरनिराळ्या आवक-जावक पत्रांच्या फायली ठेवणे, पत्राची उत्तरे टाईप करून घेणे, सिमेंट लोखंडी शिगा वगैरे बांधकामास लागणारे सामान मिळविण्यासाठी त्या त्या कंट्रोलरकडे भेटीस जाणे, बांधकाम सुरु झाल्यावर वेळोवेळी देखरेख करून बालमंदिरास आवश्यक त्या सोई करून घेणे इत्यादी अनेक अकामे करता करता आमचे अनुभवी जीव मेटाकुटीस येत. त्यावेळचे मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे होते. त्यासं भेटून बालमंदिराची माहिती दिली व सिमेंट वगैरे त्वरित मिळण्यासंबधी त्यांचे आश्वासन मिळाले, त्यामुळे माल मिळण्यात दिरंगाई झाली नाही. १९५० साली एप्रिल मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाले व दिनांक ६ मे १९५० रोजी श्रीमती ताराबाई मोडक याच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घादन व बालमंदिराचा वार्षिक समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. लवकरच ह्या इमारतीची जागाही अपुरी भासू लागली. अवती भोवती हौसिंग सोसायटया झाल्याने मुलांची पटावरील संख्या वाढू लागली. आमचे बालमंदिर फारच लोकप्रिय झाले होते. नको म्हटले तरी नवीन मुलांना प्रवेश द्यावा लागत होता. यावेळी आम्ही द्विखंड पद्धती करून पहिली, पण लहान मुलांच्या बाबतीत सकाळची शिफ्ट अयशस्वी झाली. एकाच वेळी मुलांना सामावून घेण्यासाठी वरचा मजला त्वरित बांधून घेण्याची जरुरी भासू लागली. या सुमारास येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. बी. एन. साठे यांच्याशी आमचा परिचय झाला. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता आम्हाला बांधकामात मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळ व्याजाने ठेवी घेवून बांधकामासाठी पैसा उभा करण्यात आला. विलेपार्ले येथील थोर समाज कार्यकर्ते बाबुराव पराजपे, श्री एस. एन. कलबाग व कै. श्री. भास्कराव गानू यांचे इमारतीच्या कामी सल्ला देण्याकरिता सल्लागार मंडळ नेमण्यात आले. वरील सर्व सभासदांनी वेळोवळी केलेल्या उपयुक्त सूचनामुळे बालमंदिराच्या वरच्या मजल्याचे काम जास्त चांगल्या रीतीने होऊ शकले. संस्था याबद्दल वरील सर्व मंडळीची तसेच श्री. साठे, आर्किटेक्ट यांची अत्यंत ऋणी आहे. बांधकामाच्या वेळी जनतेकडून घेतलेल्या पैशाच्या सर्व ठेवी व्याजासह फेडून १९६१ साली बालविकास केंद्र हि संस्था ऋणमुक्त झाली आहे. श्रीमती शारदाबाई चितळे, श्रीमती सुशीलाबाई कांबळी, डॉक्टर श्रीमती शैलजाबाई करंदीकर व श्रीमती रमाबाई चेबुरकर यांच्या सारख्या थोर व अनुभवी व्यक्ती ह्या संस्थेला अनुक्रमाने अध्यक्षा म्हणून लाभल्या हे संस्थेचे मोठे भाग्यच होय. स्वत;ची प्रशस्त हवेशीर जागा, अद्यावत असे भरपूर शिक्षण साहित्य, एकोप्याने व सेवाभावाने काम करणाऱ्या, हौशी अनुभवी शिक्षिका हि आमच्या या सौ. रमाबाई परांजपे बालमंदिराची खास वैशिष्टे होत. मुंबई राज्याच्या शिक्षण खात्याकडून दरवर्षी बालमंदिराचे इन्स्पेक्शन होते. त्यांच्या रीपोर्टात बालमंदिराबद्दल अधिकाधिक प्रशासंगोद्वार काढलेले आढळून येतात, त्याचे श्रेय मुख्याध्यापिका श्री. वेणूताई जोशी व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका यांसच आहे. बाल विकास केंद्र या संस्थेच्या व्यापक धोरणानुसार स्त्रीवर्ग साठी योगासनांचा वर असे उपक्रम आतापर्यंत वेळोवेळी करण्यात आले. सध्या बाल-बालीकांसाठी नुर्त्यवर्ग चालू आहे.

बालविकास केंद्राची हि सेवा जनता जनार्दनाच्या चरणी रुजू केली आहे. बाल विकास केंद्राची सर्व कार्य व विशेषत: सौ. रमाबाई परांजपे बालमंदिराचे कार्य उत्तरोत्तर जास्त चांगल्या रीतीने व्हावीत यासाठी विले पार्ल्यातील जनतेचे सर्वतोपरी साहाय्य मिळावे अशी प्रार्थना आहे.

 

Back to Top